अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत, चुंचाळे, दत्तनगर, घरकुल आदी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, ही अनेक वर्षांची मागणी पूर्ण करावी, यासाठी स्थानिक नागरिकांसह नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे, रामदास दातीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या निवेदनासाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली असून, वीस हजार स्वाक्षऱ्या झाल्या असून, १०० टक्के नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून येत्या ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. पदमोर्चाला सुरुवात केली जाणार आहे. शनिवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. कारगिल चौक येथून प्रस्थान, पाथर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुंबईकडे रवाना होतील.
अंबड औद्योगिक वसाहतीलगत चुंचाळे, दत्तनगर, संजीवनगर, अंबड लिंकरोड परिसरात दिवसेंदिवस नागरी वस्तीचा विस्तार होत असून, या भागात गुन्हेगारी कारवायाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. हाणामाऱ्या, कामगारांची लूट, सोनसाखळी चोरी, मोबाइल, पैसे हिसकावून घेणे, धमकी, मारहाणीसाखे प्रकार नित्याचेच झाले आहेत. येथून अंबड पोलीस ठाणे दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर असल्याने घटना घडल्यावर पोलिसांना माहिती दिली असता, पोलिसांना पोहोचण्यास विलंब होत असल्याने गुन्हा करून पळून जाण्यात गुन्हेगार यशस्वी होत आहेत. याशिवाय अंबड पोलीस ठाण्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असूनही त्याप्रमाणात कर्मचारीवर्ग उपलब्ध नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येत आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, रामदास दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे, संदीप नाठे, हेमंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई पदमोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोहिमेत साहेबराव दातीर, रामदास दातीर, खंडेराव दातीर, राकेश दोंदे, विक्रम दातीर, अरुण दातीर, नितीन दातीर, मनोज दातीर, महेश दातीर, सचिन इंगोले, विजय चौधरी, शांताराम फडोळ, शरद कर्डिले, रवि दातीर, सागर शिरसाठ, त्र्यंबक मोरे आदींसह शेकडो ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.
