नाशिक हे आजच्या महाराष्ट्रातील आधुनिक आणि वेगाने वाढत असलेलं शहर असलं तरी, या भूमीची कहाणी हजारो वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. गोदावरीच्या शांत प्रवाहाजवळ वसलेली ही वसुंधरा इ.स.पूर्व 3 ऱ्या शतकापासून मानवी वस्तीची साक्षीदार असल्याचे पुरावे मिळतात. विशेष म्हणजे, नाशिकची स्थापना एखाद्या राजाने किंवा विशिष्ट वर्षी झाल्याची नोंद नाही कारण नाशिक हे शहर जन्माला घालण्यापूर्वीच इतिहास जगत होतं.
गोदावरीच्या स्वच्छ, थंड पाण्यावर पहाटेची किरणं पडतात आणि नाशिकचं शहर जणू हळूच जागं होतं शतकानुशतकांच्या आठवणी अंगात घेऊन. आज आपण ज्या नाशिकमध्ये जगतो, ते द्राक्षनगरी आहे, उद्योगांचं केंद्र आहे, कुंभमेळ्याचं जागतिक आकर्षण आहे….. पण या सगळ्यांच्या मागची खरी ओळख निर्माण करणारी पायाभरणी झाली ती दोन हजार वर्षांपूर्वी ती म्हणजे सातवाहन साम्राज्याच्या सुवर्णयुगात.
नाशिकला खरी शहरी ओळख, व्यापारिक महत्त्व, आणि सांस्कृतिक वैभव मिळालं ते सातवाहन साम्राज्यामुळे. गौतमीपुत्र सातकर्णी, नहपान आणि पुलूमावी यांच्या काळात नाशिक एक प्रमुख प्रशासकीय, व्यापारी आणि धार्मिक केंद्र बनलं. इथल्या लेण्या, शिलालेख, दानपत्रे आणि प्राचीन व्यापारी मार्ग आजही त्या सुवर्णकाळाची साक्ष देतात.
कल्पना करा, आता जिथे रस्ते, घरे, मार्केट आहेत… तिथे कधीकाळी मोठमोठाले व्यापारी मंडळी एकत्र येत असत. थकलेल्या पण अभिमानानं झळकणाऱ्या प्रवाशांच्या बैलगाड्या नाशिकच्या घाटावर विसावत असे. रोम, अरब, उत्तर भारत, दख्खन अशा सर्वच दिशांमधून येणाऱ्या व्यापाऱ्यांची पावलं इथे थांबत. नाशिक हे त्या काळात दख्खनचं सर्वात महत्वाचं व्यापारी केंद्र होतं.
रोमन नाणी, चकाकणारे दागिने, काच वस्तू, उत्तम कापड, तेल, मसाले, धातुशिल्प… या सगळ्यांचा व्यापार इथून होत असे. नाशिकच्या बाजारांमध्ये रोमन राजवटीतील नाणी इतकी फिरत होती की कारागिरांनाही त्यांच्या चकाकीची ओळख झाली होती. त्या काळचं नाशिक म्हणजे व्यापाऱ्यांच्या स्वप्नातील शहर. फक्त व्यापार नव्हे तर संधींचं दारही.
या काळाची सर्वात मोठी साक्ष देतात ते म्हणजे नाशिक मधील पांडव लेणी. तुम्ही जर तिथे शांत बसून पाहिलंत, तर दगडांच्या भिंतीसुद्धा तुमच्याशी बोलू लागतील. किंबहुना तेथील शिलालेख आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करीत असतील अन म्हणत असतील कि—
- कसे व्यापाऱ्यांनी बौद्ध भिक्षूंसाठी दान दिलं,
- कसे नहपान आणि गौतमिपुत्र सातकर्णी यांच्यातील राजकीय संघर्ष इथल्या लेखनात जिवंत आहे,
- कसे लेण्यांच्या बांधकामासाठी धन, श्रम आणि निष्ठा वाहिली गेली.
या गुंफांमध्ये बसल की अस वाटतं जणू वेळ मागे सरकली आहे, आणि त्या काळातील लोकांच्या श्वासांचा आवाज अजूनही तिथे घुमतोय. सातवाहनांच्या काळात नाशिक फक्त व्यापारातच नाही तर संस्कृतीतही तेजस्वी होतं. बौद्ध, जैन, स्थानिक जमाती, व्यापारी संघ, सर्व धर्म, परंपरा आणि समुदायांनी एकत्र मिसळून एक समृद्ध आणि बहुआयामी समाजजीवन तयार केलं होतं. धातुकाम करणारे कारागीर, दागिने बनवणारे सुवर्णकार, उत्कृष्ट कापड विणणारे विणकर, मसाले व धान्याचा व्यापार करणारे व्यापारी… प्रत्येकजण नाशिकच्या अर्थव्यवस्थेला वेग देत होता.
आज तुम्ही नाशिकच्या एखाद्या टेकडीवर उभे राहून खाली शहर बघितले तर दिसेल फक्त मॉल्स, MIDC परिसर तेथील कारखाने, नवनवीन वाइनरी, उत्तुंग हायवे… पण डोळे मिटून पाहिलंत तर त्या आधुनिक शहराच्या मागे सातवाहनांचा नाशिक दिसेल: दगडी रस्त्यांवरच्या पावलांचे आवाज, बाजारातील गजबज, लेण्यांमध्ये ध्यान करणारे भिक्षू, आणि पश्चिमेकडून येणाऱ्या व्यापारी काफिल्यांच्या घंटानादाचा प्रतिध्वनी. नाशिक आज कितीही आधुनिक झालं, तरी त्याचं हृदय अजूनही त्या सुवर्णयुगाशी जोडलेलं आहे. इथली संस्कृती, व्यापाराची परंपरा, विविधतेचा स्विकार, धार्मिक सहिष्णुता हे सगळं सातवाहनांनी दिलेलं.
म्हणूनच नाशिक हा फक्त एक शहर नाही. तो काळाच्या पलिकडचा प्रवास आहे. प्रत्येक दगड, प्रत्येक पाऊलवाट, प्रत्येक लेणी आजही सांगतं “कधी काळी हे शहर साम्राज्यांच्या सावल्यांतून उजळत होतं, आणि इतिहासाच्या पानांवर आपलं नाव सोन्याने लिहीत होतं.”
